“कोण संजय राऊत? मला सांगा कोण संजय राऊत?” असा प्रतिप्रश्न करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्याविषयीचा प्रश्नच टाळला आहे. भाजपा आणि शिंदे गटातील भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे असून मी ते ईडीला दिले आहेत. काल नाकाने कांदे सोलणारे फडणवीस या नेत्यांवर कारवाई करतील का असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. त्याविषयी विचारलं असता कोण संजय राऊत? असा प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीसांनी बोलणं टाळलं.
झाकीर नाईकने विखे पाटलांच्या संस्थेला निधी दिला, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी कोण संजय राऊत? असा प्रतिप्रश्न केला.आज उरमोडी, टेंभू आणि जीए कटापूर या तिन्ही योजनांचा आढावा घेतला. या प्रकल्पातून सातरा जिल्ह्यातील दुष्काळी भागांना पाणी मिळणार आहे. त्याला गती, फेरप्रशासकीय मान्यता देऊन निधी देण्यासंदर्भात निर्णय झाल्याच फडणवीसांनी सांगितलं.
“प्रशासकीय मान्यता देऊन प्रकल्पाच्या कामाला गती देतोय. दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे” असं फडणवीस म्हणाले. “मुंबई-बँगलोर कॉरिडोअर मार्गावर मसवड एमआयडीसी तयार करायची आहे. अन्य एमआयडीसीचे प्रश्न आहेत. यासंदर्भात आज बैठक घेतली. केंद्र सरकारने प्राथमिक मंजुरी दिली आहे. लवकरच जमीन अधिग्रहण सुरु करणार आहोत. केंद्र सरकारने त्यांचा वाटा उचलण्याच मान्य केलय” असं फडणवीसांनी सांगितलं.
