मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी; समाधानकारक पावसाची प्रतिक्षा कायम

निम्मा जून महिना उलटून गेला तरी मृगाच्या पावसाचा अद्यापही थांगपत्ता नाही. मान्सूनचे यंदा 11 जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. मात्र, अद्यापही अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे येऊ घातलेल्या खरीप हंगामाची अद्याप सुरुवात झाली नाही. कोरडवाहू क्षेत्रात कपाशीच नव्हे तर अन्य वाणांचा दाणाही पडला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र शुक्रवारी 23 जूनला हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र अद्याप देखील अनेक ठिकाणी पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने गडचिरोलीस परिसरात हजेरी लावली. त्यामुळं उकाड्यानं त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून होती. मात्र, पाऊस सतत हुलकावणी देत असल्यानं शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. त्यातच तापमानात प्रचंड वाढ झाली होती. खरीप पूर्व मशागतीची कामं पूर्ण झाली असून, पेरणीसाठी शेतकरी सज्ज आहेत. पावसामुळं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, समाधानकारक पाऊस झाल्यास पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. उष्णतेमुळं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत देखील पावसानं हजेरी लावली आहे. राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे.

मोठ्या प्रतीक्षेनंतर चिपळूणमध्ये मान्सूनच्या सरी बरसल्या आहेत. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे आगमन झाल्यानं शेतकरी सुखावला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पावसाचे आगमन झाल्यानं शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. मात्र अद्याप देखील शेतीतील पेरण्यांसाठी समाधानकारक पावसाची आवश्यकता आहे. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकरी खरीप पेरणी पूर्व मशागत करून पावसाची वाट पाहत आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.