आषाढी एकादशीला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने खुशखबर दिली आहे. विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सूरू असतानाही मुखदर्शन सुरूच राहणार आहे. शासकीय महापूजेच्या चार तासांपूर्वीच दर्शनाची रांग बंद करण्यात यायची. त्यामुळे वारकऱ्यांमोठी मोठी गैरसोय व्हायची. कारण रांगेतला कालावधी चार तासांनी वाढायचा. वारकऱ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी यंदा हा निर्णय घेण्यात आला आहे.
शासकीय महापूजेच्या चार तासांपूर्वीच दर्शनाची रांग बंद करण्यात यायची. मात्र आता आषाढी एकादशीला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने खुशखबर दिली आहे.आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पहाटे अडीच वाजता पूजेला येत असतात आणि जवळपास पहाटे पाचपर्यंत विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा आणि कार्यक्रम होत असतात. यावेळी मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असताना देखील मुखदर्शन सुरू राहणार आहे. वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी यंदा हा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीमध्ये आता सुमारे दीड ते दोन लाख भाविकांना पांडुरंगाचे मुखदर्शन घेता येणार आहे.
पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. या काळात राज्यातील खासदार, आमदार, मंत्री, अधिकारी दर्शनासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाचरणी दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र, या काळात वारकऱ्यांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यांना पांडुरंगाचे दर्शन घेता येत नाही. मात्र आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वारकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा निर्णय जाहीर केल्याने आषाढी एकादशीला केवळ दर्शन रांगेतील भाविकांनाच देवाचे दर्शन घेता येणार आहे. याचसोबत आषाढी एकादशीला मानाच्या दिंड्यांचे देण्यात येणाऱ्या दर्शन पासेसशिवाय कोणतेही व्हीआयपी दर्शन पासेस वितरित करू दिले जाणार नसल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले आहे. यामुळे दर्शन रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना पहाटेची शासकीय महापूजा संपल्यानंतर दिवसभर विठुरायाचे दर्शन पर्वणी काळात घेता येणार आहे.
