राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अजित पवारांच्या गोटात जाणे पसंत केले आहे. त्या सोमवारी अजित पवार, प्रफुल्ल पटेल व छगन भुजबळ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल्या. त्यामुळे सध्याच्या घटनाक्रमातील त्यांची बाजू स्पष्ट झाली आहे.रूपाली चाकणकर यांनी अजित पवार यांना समर्थन दिले असून पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी रूपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.याबाबतची घोषणा पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडून करण्यात आली आहे. पण दुसरीकडे मात्र किती आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
रुपाली चाकणकर सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रवादीने जुलै 2019 मध्ये रुपाली चाकणकर यांच्या खांद्यावर महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली होती. मार्च 2022 मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला. रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची अडीच वर्षे जबाबदारी सांभाळली. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी मोठ्या ताकदीने हे पद सांभाळले. त्याचेच बक्षीस म्हणून चाकणकर यांना महिला आयोगाचे अध्यक्षपद देण्यात आले होते.
प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांनी एकत्रितपणे सुनील तटकरे यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पक्षात संघटनात्मक बदल करण्याचे अधिकार सुनील तटकरे यांच्याकडे असतील, असेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. यासह अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. अनिल भाईदास पाटील यांची महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य सचेतकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
