शिंदे गुवाहाटीला असताना आम्ही भाजपसोबत जाणार होतो; प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यांनी सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांना गाफील ठेवून हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, पडद्यामागे नक्की काय घडलं याचा गौप्यस्फोट आता होऊ लागला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी याबाबतचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची चांगलीच कोंडी होणार असल्याचं दिसत आहे.

रविवारी अजित पवार यांनी आपल्या 8 आमदारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर राष्ट्रवादीत फुट पडली. तर राष्ट्रवादीने राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली. याच दरम्यान टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर असताना राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ५१ आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत सरकार स्थापनेसाठी युती करावी, असे पत्र शरद पवार यांना दिले होते, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी केला आहे. शिंदे यांनी बंड केल्यानंतर सत्तेत जाण्याची राष्ट्रवादीला संधी होती. राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपशी युती करण्याचा आग्रह पक्षाध्यक्षांना धरला होता. पण राष्ट्रवादीचं नेतृत्व निर्णय घेण्यात अपयशी ठरलं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी संधी साधली आणि देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं, असा दावाही पटेल यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत सत्तेत गेला होता. त्यानंतर आता भाजपासोबत सत्तेत आहे. त्यात वावगे काहीही नाही. अशी भावना सर्व आमदारांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी व्यक्त केली असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबतही जाऊ शकतो, असे देखील ते म्हणाले.तसेच, केवळ आमदारच नाही तर राष्ट्रवादीचे नेते आणि तळागाळातील कार्यकर्ते हे सरकारचा एक भाग बनले पाहिजेत. अनेक आमदारांना मतदारसंघासाठी निधी वाटप, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आदी समस्यांना सामोरे जावे लागत होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असल्याने हे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील अशी आमची अपेक्षा आहे, असा विश्वास त्यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.