अजित पवारांना किती आमदारांचं पाठिंबा ? शरद पवारांना कोणत्या आमदारांचं समर्थन हे बैठकीनंतर स्पष्ट होईल

आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा दिवस आहे.तीन दिवसांपूर्वी म्हणजे 2 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला.अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना राजकीय धक्का दिला.अजित पवार यांनी काका शरद पवार यांची राजकीय विचारधारासोडून शिवेसना-भाजपा सरकारमध्ये सहभागी झाले.अजित पवार यांनी रविवारी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ,दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे त्यांच्यासोबत होते.आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची मुंबईत बैठक पार पडणार आहे.कोणत्या बैठकीला किती आमदार उपस्थित राहणार यावरून आज संख्याबळाचं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र या बैठकीपूर्वीच बहुमताचा आकडा समोर आला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी मोठा दावा केला आहे.अजित पवार यांना 44 आमदारांचा पाठिंबा असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांसोबत 44 आमदार असल्याचा दावा पटेल यांनी केला आहे. 44 आमदारांमध्ये विधानसभेचे 42 आणि विधान परिषदेचे 2 आमदार आहेत. या 44 आमदारांनी अजित पवार यांना प्रतिज्ञापत्र दिलं आहे. शरद पवार यांना केवळ 11 आमदारांचा पाठिंबा आहे असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. मात्र जरी प्रफुल्ल पटेल यांच्याकडून असा दावा करण्यात आला असला तरी बहुमताचं चित्र हे बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे. या बैठकीनंतरच दोन्ही गट आपली पुढील रणनिती ठरवण्याची शक्यता आहे.

अजित पवारांसह 9 आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.या निर्णयाला बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार यांच्या गटाकडून करण्यात येत आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला किती आमदारांचा पाठिंबा आहे?असा प्रश्न उपस्थित होतोय.यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.ते राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आमचा आहे.सगळेच 53 आमदार आमच्याकडं होते.त्यातील 9 जणांवर कारवाई केली आहे.53 पैकी 9 सोडून बाकीचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत.त्यामुळे आमदारांना संकटात टाकू नये.त्यांना प्रलोभने दाखवून दबाव टाकू नये.सर्वांना शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करून द्यावे असं आवाहन करतो.

मुंबईत होणाऱ्या बैठकीनंतर 6 जुलैला म्हणजे उद्या नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शरद पवार हे स्वत: असणार आहेत.या बैठकीत काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीच्या आधारे पक्षाचा प्रभारी कोण असेल याचा निर्णय होणार आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने घेऊन कायदेशीररीत्या आपली बाजू भक्कम करण्याचा शरद पवारांचा हा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अजित पवार यांनी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवलं.दोन्ही गटांकडून परस्परविरोधी नियुक्त्या सुरु झाल्या.शरद पवारांसोबत आमदार असल्याच चित्र दिसत होतं.पक्ष संघटनेवर पकड मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते.राष्ट्रवादी काँग्रेसचे आज मुंबईत दोन मेळावे होणार आहेत. अजित पवार यांच्या गटाचा मेळावा बॅण्ड्रा एमआयटी येथे होणार आहे तर शरद पवार गटाचा मेळावा यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणार आहे.या दोन्ही मेळाव्यांआधी एक महत्वाची बातमी आहे.