मुंबई, महाराष्ट्रासह सध्या देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस चांगलाच बरसताना दिसत आहे. मंगळवारी मुंबई आणि नजीकच्या किनारपट्टी भागातून काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला तरीही हलक्या सरींनी शहराला ओलंचिंब केल्याचं पाहायला मिळालं. पुढील 48 तासांचा आढावा घ्यायचा झाल्यास, आयएमडीच्या वृत्तानुसार येणारे दोन दिवसही पावसाचेच असणार आहेत.
पाच आणि सहा जुलै दरम्यान राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सहा जुलैपर्यंत मान्सूनची तीव्रता वाढणार असून हा तीव्र कमी दाबाचा पट्टा कोकणाच्या उत्तर दिशेने सरकणार आहे. तर, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पर्जन्यमानाचा अंदाज आहे.हवामान खात्याने पुढील ४ दिवसांत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्हयासह विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपुर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पुणे वेधशाळेचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी दिलेल्या माहिती नुसार, 5 आणि 6 जुलै रोजी पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. सहा जुलैपर्यंत मान्सूनची तीव्रता वाढणार असून हा तीव्र कमी दाबाचा पट्टा कोकणाच्या उत्तर दिशेने सरकणार आहे. तर, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पर्जन्यमानाचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात काहीशा धीम्या गतीनं आलेला मान्सून अद्यापही राज्याच्या काही भागांमध्ये पूर्णपणे सक्रिय झालेला नसल्यामुळं या भागांमध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे. इथं पाऊस आला खरा, पण तो फार काळ टीकलाच नाही. ऐन मोसमातच पावसानं दडी मारल्यामुळं आता वर्ध्यातील बळीराजा हतबल झाला आहे. तिथं वाशिममधयेही परिस्थिती वेगळी नाही. वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत 30 टक्के पेरण्या झाल्या आहेत.
