पळसाची पाने पायाला बांधून उन्हातून जाणारी मुलगी राष्ट्रपती; देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली लोकशाहीची सुंदरता

शाळेत जाताना चपला नसायच्या. त्यामुळे पळसाची पाने पायाला बांधून उन्हातून चिखलातून पाय तुडवत त्या जायच्या. पावसाळ्यात पोते पांघरून शाळेत जावे लागायचे. पण त्याही परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. एका छोट्या गावातून आलेली एक आदिवासी बालिका या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकते यापेक्षा सुंदर आपल्या संविधानाचे देणे काय असू शकते? आपल्या लोकशाहीची याहून सुंदर भेट कोणती असू शकते? असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांचा महाराष्ट्रा राज्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील राजभवन येथे झाला. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभेचे अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे आदीउपस्थित होते.फडणवीस म्हणाले, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ‘अमृत काल’ची संकल्पना घेतली आहे. या ‘अमृत काला’त येत्या 25 वर्षात आपल्या देशाला विकसित राष्ट्र म्हणून प्रस्थापित करायचे आहे.या ‘अमृत काला’च्या प्रारंभी द्रौपदी मूर्मु यांचे राष्ट्रपतीपदी विराजमान होणे यातून या देशाची महानता दिसते. एका छोट्या गावातून आलेली एक आदिवासी बालिका या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकते यापेक्षा सुंदर आपल्या संविधानाचे देणे काय असू शकते? आपल्या लोकशाहीची याहून सुंदर भेट कोणती असू शकते? फडणवीस म्हणाले, माननीय राष्ट्रपतींचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रेरक आहे. माननीय राष्ट्रपती आज सकाळी जेव्हा आदिम जनजातींशी संवाद साधत होत्या, त्यावेळी त्यांनी त्यांच्या लहानपणीची आठवण सांगितली. शाळेत जाताना चपला नसायच्या. त्यामुळे पळसाची पाने पायाला बांधून उन्हातून चिखलातून पाय तुडवत त्या जायच्या. पावसाळ्यात पोते पांघरून शाळेत जावे लागायचे. पण त्याही परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. एक शिक्षिका म्हणून त्यांनी निर्णय केला की इतरांनाही शिकता यायला पाहिजे. म्हणून त्यांनी जास्तीत जास्तीत लोकांना शिक्षण घेता यावे, अशी व्यवस्था उभी केली.

त्यांच्या नावे अनेक विक्रमांची नोंद असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले राष्ट्रपती गावातून कॉलेजला जाणाऱ्या तुम्ही पहिल्याच तरुणी होत्या. गावातून पहिली महिला नगरसेविका होण्याचा मान त्यांना मिळाला. सर्वात कमी वयात राष्ट्रपती होण्याचे सौभाग्यही लाभले. आदिवासी समाजातून येणाऱ्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती त्या आहेत. ओरिसातून येऊन राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्याच आहेत. स्वतंत्र भारतात जन्म घेतलेल्या पहिल्या राष्ट्रपतीही त्याच आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व सरळ आणि तरल आहे. असे अनेक गुण त्यांना महान बनवतात.

राज्यपाल म्हणून त्यांनी केलेले कार्य देखील उल्लेखनीय आहे. एक राज्यपाल काय पद्धतीचे परिवर्तन घडवू शकतात याचे उदाहरण आपण घालून दिले. मुख्यमंत्र्यांची संवाद साधून त्यांनी योग्य निर्णय करावेत यासाठी सकारात्मक भूमिका आपण नेहमीच घेतली, अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रपतींचा गौरव केला. राष्ट्रपती म्हणून काम करत असताना भारतातील आदिम जनजातींसाठी त्यांनी दृढ भूमिका घेतली आहे. त्यांच्यासाठी नव्या योजना चालू करून घेतल्या आहेत. ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने आपल्या देशातील जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण केले, या वर्गासाठी मनात असणारी संवेदनशीलता हे त्यांचे महानतेचे दर्शन घडवते, असे फडणवीस म्हणाले.