उद्धव ठाकरेंच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे, असा अंदाज सध्या व्यक्त होत आहे. ठाकरे गटातील एक मोठा नेता शिवसेनेत प्रवेश करणार आहे. ठाकरे गटातील विधान परिषदेचा एक आमदार शिंदेंच्या गळाला लागल्याची माहिती मिळत आहे. तसेच, आजच या आमदारासह काही महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आज शिंगे गटात प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटातील विधान परिषदेतील एक आमदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेत जाणारे आमदार कोण आहेत याचे तर्क लावले जातायत. विधान परिषदेच्या एका आमदारासह दोन मोठे पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची साथ सोडणार आहेत.
शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असलेला संबंधित आमदार उद्धव ठाकरे यांचा अत्यंत निकटवर्तीय मानला जातो. गेली अनेक वर्ष तो शिवसेनेत कार्यरत आहे. विधानपरिषदेतील ठाकरे गटाचं संख्याबळ कमी होत असल्यामुळे या प्रवेशानंतर ठाकरे गटाकडे असलेलं विरोधी पक्षनेतेपदही जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या विधानपरिषदेत विरोधी पक्ष नेतेपदाची धुरा सांभाळणाऱ्या अंबादास दानवे यांच्यावर टांगती तलवार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती बघता काँग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करू शकते.
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. तसंच आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आज त्यापेक्षा मोठा धक्का ठाकरेंना बसणार असल्याचं म्हटलं जातय. आज दुपारी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
