राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात हालचालींनी वेग आला आहे. राज्यातील आगामी निवडणूकीच्या दृष्टीने जागांसाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.यादरम्यान राज्य निवडणूक आयोगाने लवकरच निवडणूका लागण्याचे मोठे संकेत दिले आहेत. राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान निवडणुका लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
वर्षभरापूर्वी शिवसेना गटातून एकनाथ शिंदे गट वेगळा झाला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचा गट वेगळा झाला.आता सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीसोबत राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत आला. सत्ताधारी पक्ष राज्यात अधिक मजबूत झाला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळाले आहे.राज्य निवडणूक आयोगाने येत्या सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहे.
राज्यात 23 महानगरपालिकांची मुदत संपली आहे. त्यांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. तसेच 25 जिल्हा परिषदा आणि 207 नगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदांच्या निवडणुका महत्वाच्या असतात. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समित्यांच्या निवडणुका होतात. तसेच राज्यातील 92 नगरपरिषदांमधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाचाही मुद्दा प्रलंबित आहे. या सर्व निवडणुकांची वाट स्थानिक पातळीवर पाहिली जात होती. आता निवडणूक आयोगाने राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान निवडणुका घेण्याची संकेत दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता असल्यामुळे इच्छुकांनी तयारी करायला सुरुवात करायला हरकत नाही.
राज्यात लवकरच निडणूकीचे बिगुल वाजणार
राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आयोगाच्या राजपत्रात उल्लेख आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित करण्यात येत असल्याचा देखील पत्रात उल्लेख केला आहे. हे परिपत्रक सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झाले आहे. 5 जुलै 2023 रोजी काढलेले हे परिपत्रक आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने पावसाळानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे म्हटले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते
राज्यात काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकांबाबात देखील अशीच माहिती समोर आली होती. लांबणीवर पडलेल्या राज्यातील पालिका निवडणुका होण्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.मुंबई महापालिकेच्या निवडणूक ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होतील,असा अंदाज देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी वर्तवला आहे.फडणवीस म्हणाले होते की,आम्ही लांबवल्या नाहीत. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अनेक याचिका दाखल केल्यामुळे निवडणुका लांबल्या आहेत.त्याचबरोबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील,असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे

