राज्याचं पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

राज्यात एकीकडे राजकीय भूकंप होत आहेत. पावसाळी अधिवेशनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. 17 जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. हे अधिवेश 17 ते 4 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. कामकाज सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली आहे. 9 किंवा 10 जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे.मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काल, गुरुवारी रात्री मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची नंदनवन या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. उर्वरित मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजप आणि शिवसेनेच्याच आमदारांचा शपथविधी होणार असल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आली.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्याचं विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे होतं आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार होते. पण आता अजित पवारांनीच बंड केल्यामुळे राज्याचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. अधिवेशनाची तारीख जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी अधिवेशनाच्या आधी महाविकास आघाडीचे नेते एकत्र बैठक घेऊ, ज्याची संख्या जास्त असेल त्याला विधानसभा विरोधी पक्षनेते पद मिळेल, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पावर विरुद्ध पवार असे दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये सध्या आमदार, पदाधिकारी यांची गळती सुरू आहे. अनेक बडे नेते यामध्ये असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.