मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती नीलम गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

पावसाळी अधिवेशनापुर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मनिषा कायंदे यांच्या पाठोपाठ विधान परीषद उपसभापती आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोऱ्हेंनी प्रवेश केला आहे.नीलम गोऱ्हे यांनी 1987 पासून सामाजिक कार्यास सुरुवात केली. सामाजिक कार्य करत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नीलम गोऱ्हे यांनी काही काळ सामाजिक चळवळीत काम केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

नीलम गोऱ्हे यांची ओळख फक्त विधान परिषदेवरील आमदार नाही, त्या अनेक वर्ष विधान परिषद सभागृहात उपसभापती म्हणून काम करत आहेत नीलम गोऱ्हे यांनी १९९८ साली शिवसेना पक्षात प्रवेश घेतला, तेव्हापासून त्यांची निष्ठावान शिवसैनिक आणि शिवसेनेचा महिला चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक वर्ष त्यांनी माध्यमात शिवसेनेची खंबीरपणे बाजू मांडली.

नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामांमुळे देशाचा विकास झाला आहे. महिलांचे प्रश्न आणि देशाचा विकास हा मुख्य उद्देश ठेऊन मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुषमा आंधारे यांचे महत्व उद्धव ठाकरे यांच्या गटात वाढल्यामुळे आपण नाराज झाल्या का? या प्रश्नावर त्यांनी नकार दिला. माझी भूमिका विकासाची आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकास होत आहे. त्यामुळेच मी त्यांच्यसोबत जाण्याचा निर्णय घेतले. पक्ष प्रवेशानंतर नीलम गोऱ्हे यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरची भूमिका विषद केली. आपली कोणतीही नाराजी नाही, असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.