मी जे पुन्हा येईन असे म्हटले होते… मी पण आलो… इतरांनाही सोबत घेऊन आलो – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मी जे पुन्हा येईन असे म्हटले होते… मी पण आलो… इतरांनाही सोबत घेऊन आलो अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कवितेचा अर्थ उलगडत सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

भाजपचे प्रदेश संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या काव्य संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात फडणवीस बोलत होते.यावेळी आपल्या ‘ मी पुन्हा येईन ‘ या कवितेवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, आपण ज्या मानसिकतेत असतो त्याप्रमाणे त्या कवितेचा प्रत्यय आपल्याला येतो. मी देखील विधानसभेत एक कविता म्हटली होती “मी पुन्हा येईन!” कविता म्हटली त्यावेळेस वाटले नव्हते की इतकी अडचण होईल. त्यावेळेस लोकांनी ही कविता डोक्यावर घेतली.आठ दिवसात दहा भाषांमध्ये अनुवाद करून टाकले. त्यानंतर राज्य आले नाही तर या कवितेमुळेच राज्य गेले असे देखील अनेकांनी सांगितले. शेवटी मला हे सांगावे लागले की मी जे पुन्हा येईन असे म्हटले होते मी पण आलो आणि इतरांना पण सोबत घेऊन आलो. परवा अजून एकाला सोबत घेऊन आलो त्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कविता वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला तिचा प्रत्यय देत असते.