संजय राऊतांचा नाहक बळी गेला; मी त्यांच्याविषयी फार बोलणार नाही – नीलम गोऱ्हे

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदेंच्या शिवसेनेत 7 जुलैला जाहीर प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. मात्र, शिवसेनेच्या रणरागिनी अशी ओळख असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी का दिली? याचे कारण समोर आलं नव्हतं. पण आता त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे.

संजय राऊत यांनी मला कायम मदत केली. त्यांनी मला आमदारकीच्या वेळीही सहकार्य केले. माझ्यासाठी शब्द टाकला. त्यामुळे त्यांच्याविषयी मी फारसे बोलत नाही. पण त्यांच्या पत्रकार परिषदेवर बोलायचे झाल्यास, शिवसेनेचा प्रत्येक प्रवक्ता ज्यावेळी काही बोलतो तेव्हा त्याला पक्षाकडून जे सांगितले जाते तेच तो बोलत असतो.त्यानुसार, आक्रमकपणे भूमिका मांडणारा नेता म्हणून संजय राऊतांकडे ती भूमिका आली होती. त्याचा संजय राऊतांना खूप त्रास झाला. मला वैयक्तिक असे वाटते की, संजय राऊत यांचा यात नाहक बळी गेला, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

शेवटी प्रत्येक प्रवक्त्याचं काय कौशल्य आहे हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. पक्षाने सांगितलेली गोष्ट कशी बोलायची हे प्रत्येक जण ठरवू शकतो. संजय राऊत आक्रमक भाषा वापरतात. मात्र संजय राऊत जे काही बोलतात ते पक्ष सांगेल तेच बोलतात असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांचा बळी कसा गेला? असं विचारलं असता नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “संजय राऊत यांना अटक झाली होती. त्यांना धमक्या येत आहेत, त्रास होतो आहे. एवढं आक्रमक ते का बोलतात ते काही समजायला मार्ग नाही. पण एकमेकांना नावं द्यायची, वैचारिक न बोलता आक्रमक बोलायचं याला काही अर्थ नाही. नाट्यमय सगळं केल्याने तेढ वाढते” असंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.