दिल्ली : कोळसा घोटाळा प्रकरणी सीबीआय विशेष न्यायालयाने राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता आणि इतरसह आरोप निश्चित केले आहेत. छत्तीसगडमध्ये कोळसा खाण वाटपात घोळ केल्याचा आरोप लावण्यात आला.कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणांमध्ये विशेष न्यायालयाने काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डांसह सर्व आरोपींना दोषी ठरवले. या आरोपींच्या शिक्षेवरील सुनावणी 18 जुलैला होणार आहे. आयपीसी कलम 120बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली न्यायालयाने या सर्वांवर छत्तीसगडमधल्या फतेपुर खाणीचं कंत्राट जेएलडी यवतमाळ एनर्जीला चुकीच्या पद्धतीने मिळवल्याचा ठपका ठेवला आहे.
कोळसा घोटाळा प्रकरणात माजी खासदार आणि ‘लोकमत’ माध्यम समूहाचे विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एचसी गुप्ता, केएस क्रोफा आणि के सी सामरिया या दोन अधिकाऱ्यांसह जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि तिचे संचालक मनोज कुमार जयस्वाल या सर्वांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
सीबीआयने 27 मार्च 2013 रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात या सर्वजणांनी गैरमार्गाने कोळसा खाणी आपल्या ताब्यात घेतल्या, असा आरोप केला होता. 20 नोव्हेंबर 2014 रोजी सीबीआयचा या प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्यास नकार देत या प्रकरणाचा तपास सुरु ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यावेळी न्यायालयाने दर्डा यांनी पंतप्रधान मनमोहनसिंह यांना लिहिलेल्या पत्रात चुकीच्या पद्धतीने तथ्यांना सादर केल्याचाही ठपका ठेवला होता.
