हा पोहरादेवीचा अपमान नाही का? व्हिडिओ दाखवत नितेश राणेंचा सवाल

ठाकरे गटाचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. “उद्धव खोटे बोलले असा फडणवासांनी आरोप करणे, हा पोहरादेवीचाच अवमान आहे. मला सकाळपासूनच अनेक लोकांनी फोन केला, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारंवार आमच्या श्रद्धास्थान पोहरादेवीचा अपमान होत आहे. पोहरादेवीची कोणीही खोटी शपथ घेणार नाही. ते जागृत देवस्थान आहे, फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे,” अशा शब्दात राऊतांनी टीका केली होती.

यावर आता भाजपकडून नितेश राणे यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे. आज सकाळी संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरा देवीची माफी मागावी असे वक्तव्य केले. पोहरा देवीची माफी कुणी मागावी याचे उत्तर ४ डिसेंबर २०१९ च्या जीआरमध्ये आहे. त्यांनी जो जीआर काढला त्यामध्ये पोहरा देवी यात्रेसाठी २५ कोटींची जी तरतूद केली होती त्याला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पोहरा देवीची आणि समाजाची माफी कुणी मागावी, याचे उत्तर संजय राजाराम राऊत यांनी द्यावे, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.तसेच मातोश्रीवर ‘जोरू का गुलाम’ आहे याची झलक देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली असल्याचे नितेश राणे यावेळी म्हणाले.

सगळ्यात मोठा खोटारडा म्हणजे मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहणारा संजय राऊतचा मालक आहे. फडणवीसांवर खोटे आरोप करू नका, असा इशाराही राणे यांनी दिला.