भारतासाठी अभिमानाचा क्षण, चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण

भारतासाठी आजचा दिवस एक ऐतिहासिक दिवस ठरला. करोडो भारतीयांसह सर्व जगाच्या नजरा भारताच्या या मिशनकडे लागलेल्या होत्या. अखेर आज 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम असलेल्या ‘चांद्रयान-3’ अंतराळात प्रक्षेपित झालं आहे. काऊंट डाउन संपताच या यानाने थेट आभाळाला चिरत पृथ्वीच्या बाहेर झेप घेतली.

चांद्रयान 2 ला आलेल्या अपयशानंतर अखेर तब्बल 4 वर्षांनी इस्त्रोनं शास्त्रज्ञांच्या प्रचंड मेहनतीच्या बळावर चांद्रयान 3 मोहिम हाती घेतली. अनेक महिन्यांची मेहनत आणि आव्हानं पेलत इस्त्रोच्या चांद्रयान 3 उड्डाणाचा दिवस उजाडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून जागतिक स्तरावरील अनेक विद्वान आणि अभ्यासकांनी या मोहिमेवर लक्ष केंद्रीत करत असतानाच अखेर शुक्रवार 14 जुलै 2023 ला चांद्रयान-3 भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी अवकाशात झेपावलं आणि या यानासह भारताच्या असंख्य महत्त्वाकांक्षाही झेपावल्या.

चांद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट केलं आहे. पंतप्रधान मोदींनी वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते सध्या फ्रान्समध्ये आहेत. “भारताच्या अवकाश प्रवासात चांद्रयान 3 ने एक नवीन अध्याय लिहिला आहे. भारतीयांची महत्वकांक्षा आणि स्वप्न यातून दिसतं. या ऐतिहासिक क्षणातून वैज्ञानिकांची मेहनत दिसून येते. त्यांना माझा सलाम” असं मोदिंनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

मोहिमेसाठी 615 कोटी खर्च करण्यात आले आहेत. जवळपास 50 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिग करेल. चांद्रयान-3 च्या लँडिगची जबाबदारी महिला शास्त्रज्ञ ऋतु करिधाल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ऋतु करिधाल चांद्रयान 3 च्या मिशन डायरेक्टर म्हणून भूमिका निभावत आहेत.