अखेर नाशिकच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी भूमिका जाहीर केली असून मतदारसंघातील विकासकामांसाठी सत्तेत जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘शरद पवार हे वडिलांसारखे असून अजितदादा भावासारखे आहेत’, मात्र या द्विधा मनस्थितीतून बाहेर पडत आमदार सरोज अहिरे आपलं निर्णय जाहीर केला आहे. मतदारसंघातील विकासासाठी अजित दादांसोबत असल्याचे स्पष्ट करत नाशिक जिल्ह्यातील सहाही आमदार आता अजित पवार गटाकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मतदार संघातील विकास कामांसाठी सरकारसोबत जाणे गरजेचे होते. मतदार संघातील लोकांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे यावेळी आमदार सरोज अहिरे यांनी सांगतले. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व 6 आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत. पुन्हा एकदा अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांना शह दिल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले.
राष्ट्रवादीमधील बंडानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात आमदारांची मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरु आहे. यातच नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ, दिलीप बनकर, नितीन पवार, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ आणि आता सरोज अहिरे यांनी आपला पाठिंबा अजित पवारांना जाहीर केला आहे, या आमदारानं पैकी छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आहेत.आतापर्यंत 95 टक्के नागरिकांशी, पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधलेला आहे. त्यामुळे आता आपण अजित दादांच्या स्वागतासाठी इथे आलेलो आहोत, आपण अजित पवार यांच्यासोबतच राहणार असं त्यांनी खुलासा केलेला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सहाच्या सहा आमदार अजित पवार यांच्याबरोबर आहेत.
