पुरी, हावडासह चार एक्सप्रेसला बडनेरा स्थानकावर थांबा द्या खासदार डॉ.अनिल बोंडे यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

: पुरी हावडा एक्सप्रेससह महत्त्वपूर्ण असलेल्या चार सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना बडनेरा स्थानकावर थांबा देऊन प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

अमरावती-बडनेराशहर हे अतिशय वर्दळीचे ठिकाण आहे. वैद्यकीय, शिक्षण, औद्योगिक, पर्यटन, प्रशासकीय यासह विविध क्षेत्रातील प्रवाशांची या ठिकाणी मोठी वर्दळ असते. मात्र रेल्वेने या ठिकाणावरून प्रवास करण्यासाठी पुरेशा प्रमाणात गाड्यांची उपलब्धता नाही. ही बाब लक्षात घेता प्रवाशांच्या सुविधेकरिता पुरी-सूरत साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस (22827, 22828), हावडा-मुंबई सीएसएमटी एसी दुरंतो एक्सप्रेस (12261, 12262), हावडा-पुणे एसी दुरंतो एक्सप्रेस (12221,12222) व हावडा-साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस (22893, 22894) या चार महत्त्वपूर्ण गाड्यांना अपडाऊनचा थांबा बडनेरा स्थानकावर देण्याची मागणी राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी १४ जुलै रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली. या चारही गाड्यांना बडनेरा स्थानकावर थांबा दिल्यास प्रवाशांची मोठी सुविधा होईल, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.