शरद पवारांनी दुसऱ्यांचा हात धरला होता, ज्यांचे हात धरले आहेत, ते तुमचे राहणार आहेत काय? – मंत्री छगन भुजबळ

आपल्या पोरांचा हात धरुन ठेवला असता तर कशाला हे झालं असतं, अशी टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर केली आहे. शरद पवारांनी दुसऱ्यांचा हात धरला होता, ज्यांचे हात धरले आहेत, ते तुमचे राहणार आहेत काय? असा खोचक सवाल उपस्थित करीत भुजबळांनी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांनाही सोडलं नाही. दरम्यान, मंत्रिपदाची सुत्रे हाती येताच भुजबळांनी येवल्यात छोटेखानी सभा घेतली. सभेत ते बोलत होते.

राष्टवादीमधील फुटीनंतर शरद पवार यांनी छगन भुजबळांच्या बालेकिल्ला असलेल्या येवल्यात जाहीर सभा घेतली होती. याच सभेवरुन छगन भुजबळांनी पवारांवर निशाणा साधला. “येवल्यात येऊन कोणाचा हात धरण्यापेक्षा मुलाबाळांचा हात धरला असता तर ही वेळ आली नसती; ” अशी खोचक टीका त्यांनी यावेळी केली.तसेच शरद पवार यांनी येवल्यातील सभेत आमदार नरेंद्र दराडे यांचा हात उंचावला होता. याबद्दल बोलताना छगन भुजबळ यांनी “अजित दादांचा हात धरायचा ना? ज्यांचा हात धरला त्यांचा धरून काय उपयोग.. “अशा शब्दात पवारांवर हल्लाबोल केला.

राष्ट्रवादीची स्थापना आपल्याच घरात झाली असून घड्याळ हे चिन्हही आपल्याच घरात निश्चित झाले होते. शरद पवार हे आमचे नेते आहेत. परंतु, येवल्यातून आपण जाणार नाही. कोणीही आपणास घालवू शकत नाही, असा इशारा भुजबळ यांनी दिला. घरातील मुलाचा हात धरला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असे म्हणत भुजबळ यांनी पवार यांना अजितदादांचा हात धरण्याची गरज होती, असे सूचविले. प्रतिभाताई यांना लवकरात लवकर बरे वाटो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे म्हणत भुजबळ यांनी भाषण संपविले.