आज नाशिकमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू असून या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी शासन आपल्या दारी उपक्रमासह जिल्ह्यातील विकासाबाबत अनेक विषय मांडले. सोबतच नाशिक जिल्ह्यातील अनेक कामांना गती देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही देखील अजित पवार यांनी दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण प्रकल्प असलेला शासन आपल्या दारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह आदिवासी बांधव, तरुण बेरोजगार यांचे प्रश्न सोडविण्यात येईल. त्यासाठी लागणारा निधी पुरविण्यात येईल. त्यानुसार नाशिक जिल्ह्याच्या कोणत्याही कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना अजित पवारयांनी शासकीय योजनांसाठी लाभार्थ्यांना हेलपाटे मारावे लागतात, वशिला असेल तरच कामे होतात.यामुळेच लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ व्हावा यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला असून 11 लाखांपेक्षा जास्त लोकांना याचा फायदा झाला आहे; असे म्हणत शासन आपल्या दारी या उपक्रमाचे कौतुक केले.
नाशिक जिल्ह्यातील अनेक कामांना गती दिली जाणार आहे. यात नाशिकला झोपटपट्टीमुक्त करण्याचा मानस आहे, त्याचबरोबर नाशिकची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी गोदावरी प्रदूषण मुक्त करायची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात आहे. गोदावरीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतील, तसेच अनेक दिवसांपासून रखडेलला नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येणार आहे. याबाबतची बैठकही पार पडली असून या प्रकल्पामुळे अहमदनगरसह नाशिक जिल्ह्याचा विकास होणार आहे. तसेच, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अतिशय कष्टाळू असून जिल्हा बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
“पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा झपाट्याने विकास होतोय. जगभरात भारताची पत आणि प्रतिष्ठा वाढण्याचं काम होतं आहे. केंद्रसरकारच्या माध्यमातून देशात सर्वत्र विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या मदतीने आपल्या राज्याच्या विकासाला आणखी गती देण्याचा प्रयत्न महायुतीचा आहे,” असंही अजित पवारांनी सांगितलं.
