विरोधकांची पोटदुखी घालवण्यासाठी आम्ही डॉ. एकनाथ शिदेंना आणलं आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिकमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मंत्री उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर टोलेबाजी केली आहे. शासकीय कामांवर विरोधकांकडून टीका केल्या जात आहेत. त्यांचा चांगली काम केलंलं रुचत नाही. त्यांच्या पोटात दुखायला लागतं, त्यामुळं त्यांची पोटदुखी घालवण्यासाठी आम्ही डॉ. एकनाथ शिदेंना आणलं आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

तसेच यावेळी त्यांनी शरद पवारांच्या पुस्तकाचा दाखला देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आम्हाला टीका करायची नाही. पण आमच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांच वाक्य ठरलं होतं. मला अर्थसंकल्पातलं फार कळत नाही, मला सहकारातलं काहीच कळत नाही, मला शेतीतलं काहीच कळत नाही, शेवटी पवार साहेबांनी त्या ठिकाणी पुस्तक लिहिलं त्याच्यात सांगितले यांना राजकारणातलं काहीच कळत नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. पुढे ते म्हणाले की, त्याच्यामुळे आता असं नाही आहे. आम्हाला अर्थसंकल्पातले कळतं, आम्हाला सहकारातलं कळतं, आम्हाला शेतीतलं ही माहिती आहे, असे म्हणत त्यांनी अजितदादांना देखील योग्य संदेश दिला आहे.

मागं अजित पवार म्हणाले होते की, दोनच झेंडे दिसत आहेत पण आता तिसरा झेंडापण आला आता काळजी करु नका. आपल्याला तिनही झेंडे घेऊन महाराष्ट्राचा झेंडा देशात सर्वात वर न्यायचा आहे. माझा महाराष्ट्रात देशात पहिल्या क्रमांकावर असेल हे आम्हाला करुन दाखवायचं आहे. त्यामुळं आम्हाला हा इतका मोठा प्रतिसाद मिळतो आहे, असंही ते म्हणाले. फडणवीसांनी पुढे सांगितलं की, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दिवसा वीज द्या, 12 तास अखंडित वीज द्या, म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली. नाशिक जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा असून पुढच्या तीन वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला 12 तास दिवसाच वीज मिळेल, याची तजवीज झाली आहे. त्यातल्या 50 टक्के शेतकऱ्यांची तर वीज लवकर दिली जाणार आहे. यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत टेंडर देखील काढण्यात येणार आहे. याच वर्षी त्याचं काम सुरू करण्यात येईल, असं आश्वासन फडणवीस यांनी दिले.