राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. अजित पवार 18 जुलै रोजी पंतप्रधान मोदी यांना भेटणार आहेत. याबाबत खुद्द अजित पवार यांनी माहिती दिली आहे. अजित पवार म्हणाले, ”मी 18 जुलैला पंतप्रधान मोदींना भेटणार आहे.” या बैठकीत मी त्यांच्यासोबत शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडणार आहे. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्यातील मोठ्या राजकीय भूकंपानंतर अजित पवार दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
नाशिक येथे पत्रकार परिषद अजित पवार बोलत होते. यावेळी माॅन्सूनचा पाऊस न पडल्याने राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. केंद्र सरकारकडून अधिक मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर एनडीएच्या 18 जुलैच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असणार आहेत. दिल्लीत एनडीएची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आगामी निवडणुकींवर चर्चा करण्यात येणार आहे. अजित पवारांचा हा दुसरा दिल्ली दौरा असणार आहे. यापूर्वी खातेवाटपाआधी अजित पवारांनी अमित शाहांची भेट घेतली होती.
