राज्य शासनाने मुलींसाठी सुरू केलेली सैनिक सेवापूर्व प्रशिक्षण संस्था ही देशासाठी आदर्शवत ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. येथील सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट. कमांडर ओंकार कापले, अर्जून पुरस्कार प्राप्त खेळाडू कविता राऊत, संस्थेच्या संचालिका मेजर (निवृत्त) सईदा फिरासत आदिमान्यवरउपस्थितहोते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात मुलींसाठी अशा प्रकारची संस्था सुरू होणे ही गौरवास्पद बाब आहे. पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यातून आज ही सैनिकी प्रशिक्षण संस्था उभी राहिली आहे. या संस्थेच्या माध्यमातून मुली देशसेवेसाठी सैन्यात दाखल होऊन त्यांना अधिकारी पदापर्यंत पोहचण्याची संधी प्राप्त होणार आहे. या मुलींना दर्जेदार सैनिकी प्रशिक्षण अनुषंगिक सेवासुविधा प्राप्त होण्यासाठी शासनाकडून निधीची कमतरता भासणार नाही. या संस्थेच्या मागे शासन खंबीरपणे उभे राहील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींशी संवाद साधला.
