राज्य विधिमंडळाच्या तीन आठवडय़ांच्या पावसाळी अधिवेशनाला आज पासून प्रारंभ होत आहे. संख्याबळ घटले असले तरी विरोधक माघार घेणार नाहीत, असे स्पष्ट करीत विरोधकांनी आक्रमक होण्याचे सूचित केले आहे. पावसाने दिलेली ओढ, दुबार पेरण्यांचे संकट, कृषी क्षेत्रावरील संकट यावर मार्ग काढण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर असेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांनी कामाला सुरुवात केल्यानंतर महाविकास आघाडीची बाजू काहिशी कमकुवत झाली असून, सत्ताधारी तीन गटांचा अधिवेशनावर वरचष्मा राहील, असे दिसते. अशातच काँग्रेसने उभय सभागृहातील विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितल्यामुळे सत्ताधारी तीनही पक्षात समाधानाचे वातावरण आहे.विधानसभेतील पक्षनिहाय आमदारांची आसनव्यवस्था कशी राहील, याचा निर्णय विधानसभा सभागृह सुरू झाल्यानंतर होईल. परिणामी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची आमदार संख्या यातून स्पष्ट होईल. शिवाय अधिवेशनाचा पहिला दिवस विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याचे पद रिक्त असल्यामुळे त्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेस मधल्या फुटीनंतर कोणत्या गटाकडे किती आमदार हे समोर आलेलं नाही. अजित पवार गटाने आपल्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला. तर जयंत पाटील यांनी आमच्याकडे 19 आमदार असल्याचे म्हटले. 9 मंत्री वगळता इतर आमदारांची विरोधी पक्षात बसण्याची व्यवस्था करावी असं पत्र जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे. त्यामुळे कोणाच्या गटात किती आमदार हे आज स्पष्ट होईल. जितेंद्र आव्हाडांनी व्हीप जारी केला आहे. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोडा मैदान लांब नाही उद्या समजेल काय आहे, असे सूचक वक्तव्य अजित पवारांनी केलं होत.
