मनोज सोनी यांच्या कुटुंबाला खासदार डॉ.अनिल बोंडे यांची १ लक्ष रुपयांची मदत;पत्नी सोनालीचे पालकत्व घेत साडी चोळी देऊन सांत्वन

अमरावती : विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता मनोज सोनी यांची १ जुलै रोजी निर्घुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे व डॉ. वसुधा बोंडे यांनी सोनी कुटुंबीयांना मदतीचा हात देत सोनाली सोनी यांना १ लक्ष रुपयाचा धनादेश सुपुर्द केला असून त्यांचे संपूर्ण पालकत्व स्वीकारले व साडीचोळी देऊन त्यांचे सांत्वन केले.

‘लव्ह जिहाद’मध्ये आडकाठी ठरल्याने मनोज सोनी यांची हत्या केल्याचा आरोप राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी समाजातील सर्व घटकांना सोनी यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार त्यांनी व डॉ. वसुधा बोंडे यांनी आज मनोज सोनी यांच्या पत्नी सोनाली यांना कार्यालयात बोलून त्यांचे साडीचोळी देऊन सांत्वन केले. सोनाली ह्या आठ महिन्यांच्या गरोदर आहेत. त्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी व प्रसुती सुद्धा बोंडे हॉस्पिटलच्या वतीने केली जाणार आहे. यासह मातोश्री त्रिवेणीताई बोंडे चारिटेबल ट्रस्टच्या वतीने आज डॉ.अनिल बोंडे व डॉ.वसुधा बोंडे यांनी १ लक्ष रूपयांचा धनादेशही सोनाली यांना सुपुर्द केला.