मुंबई सह राज्याला पावसानं झोडपलं आहे. हवामान विभागाकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईत मंगळवारपासूनच पावसाने हजेरी लावली असून आज, बुधवारी पावसाचा जोर वाढवला आहे. मुंबईत पुढच्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने ही माहिती दिली आहे. मुंबईसह ठाणे आणि रत्नागिरीलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे रखडलेली खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे. तसेच पावसाने ओढ दिलेल्या भागातील पिकांना जीवदान मिळणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठचे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. खेडमधील खाडीपट्टा विभागाला जोडणारा खेळ देवणे सुसरी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे तब्बल वीस गावांचा संपर्क तुटलेला आहे. वीस गावांना जाण्यासाठी एकही मार्ग आता नाही त्यामुळे या गावांचा संपर्क तुटला आहे.
चिपळून शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. वशिष्ठ नदीला पूर आलाय. चिपळून शहरात सखल भागात पाणी साचलय. रात्री एनडीआरएफच पथक दाखल झालय. नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिलाय.रायगडमध्ये अंबा नदीने पाण्याची पातळी ओलांडली आहे. पाणी रस्त्यावर आलं आहे. त्यामुळे पाली-खोपोली मार्ग बंद झालाय. नदीकाठच्या गावांना सर्तकेतेचा इशारा देण्यात आलाय. 24 तासापासून मुसळधार पावसाने झोपडून काढलय.
