रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल होत आहेत. दरम्यान, घटनास्थळी जात असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनास्थळी पोहोण्यासाठी मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर असलेलं धुकं बाधा ठरतंय. तसेच पावसामुळे डोंगराचा रस्ता अत्यंत निसरडा झाल्यामुळं बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे.
इर्शाळवाडी हे एक छोटंसं गाव असून त्या गावात ५० ते ६० घरांची वस्ती आहे. पावसामुळे इर्शाळगड खडकाचा काही भाग कोसळला असून त्यात अनेक गावकरी माती-खडकांच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना काल (बुधवार, १९ जुलै) रात्री ११.३० ते १२ च्या दरम्यान घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, दादा भुसे यांनी घटनास्थळी जात परिस्थितीचा आढावा घेतला आहे.मदतीसाठी इर्शाळवाडी गावातच पोलिस कंट्रोल रुम बनवण्यात आले आहे. मदतीसाठी 8108195554 या क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
