नरेंद्र मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री बनविण्यासाठी भाजपा जोमाने काम करणार – खासदार डॉ.अनिल बोंडे यांचे प्रतिपादन

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पदभार स्वीकारत कार्यकर्त्यांना दिला मूलमंत्र
अमरावती : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत यश मिळवित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री बनविण्यासाठी भारतीय जनता पक्ष अधिक जोमाने काम करणार असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांनी केले. खासदार डॉ. अनिल बोंडे यांची भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर भाजपा कार्यालयात त्यांचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. दरम्यान कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या आनंदाला उधाण आल्याचे पाहायला मिळाले. सर्वांनी उत्साहात त्यांचे स्वागत केले. आयोजित पदग्रहण समारंभाच्या विचारपिठावर आमदार प्रताप अडसड, माजी आमदार रमेश बुंदिले, प्रभुदास भिलावेकर, मावळत्या अध्यक्षा निवेदिता चौधरी, प्रदेश सचिव जयंत डेहनकर, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, कार्यकारणी सदस्य दिनेश सूर्यवंशी, राजेश वानखडे, नितीन गुडधे पाटील, रविराज देशमुख, गोपाल चंदन, संगीता शिंदे-बोंडे, प्रियंका मालठाणे, रेखा मावसकर, क्षमा चौकसे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभार स्वीकारला. यावेळी ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे देशाला गरज आहे. जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे उंचावत आहे. देशाला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी पुन्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री बनवण्यासाठी भाजपा अधिक जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवराय कुलकर्णी मावळत्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले सर्वांनी घरोघरी जावून सरकारच्या योजना, पक्षाचे कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

पक्षासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे : निवेदिता चौधरी

यावेळी मनोगत व्यक्त करताना मावळत्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी पक्षासाठी केलेल्या कामाची माहिती दिली. सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या अथक प्रयत्नामुळे माझा कार्यकाळ हा चांगला राहिला. कार्यकर्त्यांनी कधीही हिंमत हारू नये, आगामी काळात संघर्षाचा आहे असे त्यांनी नमूद केले.

डॉ. बोंडेंनी आदर्श घालून दिला : कुलकर्णी

राज्य व राष्ट्रीय पातळीवर अफाट कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. अनिल बोंडे यांनी, ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याग व निष्ठेच्या माध्यमातून आदर्श घालून दिला त्याच आदर्शाचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले. दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय स्तरावरील अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची यांची ये-जा असते. किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस, प्रदेशाध्यक्षपद तसेच केंद्र सरकारच्या विविध समित्यांवर त्यांनी अतुलनीय कार्य केले आहे. आता त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. पक्षाचा आदेश अंतिम समजून त्यांच्या कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी म्हणाले.