भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षात अस्वस्थ असल्याच्या चर्चा आहेत. पंकजा मुंडे या आपल्या नाराजीवर वेळोवेळी भाष्यही करत असतात. मात्र, भाजपमध्येच आपण राहणार असल्याचंही त्या वारंवार सांगत असतात. त्यांच्या नाराजीच्या चर्चा येत असल्याने त्यावर चर्चा होत असतात. पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांनी आता या मुद्द्यावर भाष्य करतानाच पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याचे संकेतही दिले आहेत. ते नगर दौऱ्यावर मीडियाशी बोलत होते.
पंकजा मुंडे सध्या भाजपमध्ये राष्ट्रीय सचिव आहेत. मात्र राष्ट्रीय समाज पक्षात आल्यानंतर बहीण म्हणून काय करायचं ते तेव्हा मी ठरवेल. पंकजा मुंडे सध्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे आता मी फक्त तिला दिल्या घरी सुखी रहा असेच म्हणेल. मात्र जेव्हा पंकजा मुंडे यांना खूप त्रास होईल तेव्हा साडी चोळी घेऊन मी तिला आणायला जाईल, असं महादेव जानकर म्हणाले.
जानकर नगर जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये जास्त त्रास होईल तेव्हा साडी चोळी घेऊन घ्यायला जाईन. पंकजा या भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्या माझ्या बहिण आहेत. राष्ट्रीय समाज पक्षात आल्यानंतर बहीण म्हणून काय ती जबाबादारी मी देईन. मात्र सध्या दिल्या घरी सुखी राहा इतकेच मी पंकजा मुंडे यांना सांगेन. ज्यावेळी पंकजांना भाजपमध्ये त्रास होईल तेव्हा मी बहिणीला साडी चोळी घेऊन घ्यायला जाईल, असे जानकर म्हणाले.
रासप नेते महादेव जानकर यांनी भाजपाच्या सध्याच्या राजकारणावरही जोरदार टीका केली. मी गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच भाजपबरोबर गेलो होतो. मुंडे हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. पण, आताचे नेते स्वतःला त्यांच्यापेक्षा जास्त हुशार समजतात. म्हणून कदाचित त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाची गरज वाटत नसेल. त्यामुळे आम्हीही आता भाजपाच्या मागे लागणार नाही, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे
मला अनेकदा डावलण्यात आलं पण मी कधीच नाराजी व्यक्त केली नाही. 2019 मध्ये विधानपरिषद निवडणुकांसाठी तयार करा असे मला सांगण्यात आले होते. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या दहा मिनिटे आधी थांबण्यास सांगितले गेले. या मुद्द्यावरही मी कधीच भाष्य केले नाही. पक्षाच्या तत्वांचे नेहमीच पालन केले. पक्षाच्या विरोधात कधीच काम केले नाही असे पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत म्हटले होते.
