काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर राजभवनमध्ये आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली.या शपथविधीनंतर बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस या नावाखाली आणि घड्याळ या चिन्हाखाली आम्ही निवडणूक लढवणार आहोत.
उद्धव ठाकरे पाठीत खंजीर खुपसतात, तेव्हा तुम्हाला अजित पवारांना सोबत घेऊन शपथ घ्यावी लागते अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उबाठा ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते एका मराठी वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.महाराष्ट्राच्या राजकारणातील उलथापालथीची अवघ्या देशात चर्चा रंगली आहे. या चर्चेमुळे राज्याचे राजकारण तापले असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करत अजित पवारांना सोबत का घेतले? या कळीच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
जेव्हा उद्धव ठाकरे तुमच्यापाठीत खंजीर खुपसतात, तेव्हा तुम्हाला अजित पवार यांना सोबत घेऊन शपथ घ्यावीच लागते. नाही तर उद्धव ठाकरेच यशस्वी होतात. पाठीतला खंजीरच यशस्वी होतो. त्यामुळे माझ्या पाठितील खंजीर काढून मी ताठ उभा राहू शकतो. तुमचा मुकाबला करू शकतो. तुम्हाला घरी पाठवू शकतो हे दाखवून द्यावं लागतं, अशी रोखठोक प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.आजही उद्धव ठाकरे, त्यांचे कार्यकर्ते आणि एनसीपीच्या ट्रोलर्सना माझं ओपन चॅलेंज आहे, आमच्या विरोधातील एक गोष्ट जरी तुमच्यासमोर असेल तर ती समोर घेऊन या एक गोष्ट आणा मार्केटमध्ये. ओपन चॅलेंज आहे, असं आव्हानच देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. खुपते तिथे गुप्ते या टीव्ही शोमध्ये ते बोलत होते.
राज्यात द्वेषाचं राजकारण सुरू आहे. त्याचं जनकत्व देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार आलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या टीमने वैयक्तिक खालची पातळी गाठली. ती राज्यातील राजकीय संस्कृतीला वाईट कलाटणी देणारी होती. मग याचे भीष्म पितामह कुणाला म्हणता येईल?, असा सवाल फडणवीस यांनी केला.
मी रात्री जास्त ऍक्टिव्ह असतो. रात्री खूप एनर्जी असते. कधी कधी काही गोष्टी जास्त सोप्या असतात करण्यासाठी. मी दिवसाही तेवढाच अॅक्टिव्ह असतो असं सांगतानाच मी जगातील सर्वात प्रामाणिक माणूस आहे असा माझा दावा नाही. राजकारणात कॉम्प्रमाईज करावाच लागतो. शेवटी जो आदर्शवाद गेमच्या बाहेर टाकेल, त्याचा फायदा नसतो. गेममध्ये राहिला तर आदर्शवादी राहता येतं, असं ते म्हणाले.पाच वर्ष आम्ही सरकार चालवलं. अर्ध्या रात्री उद्धव ठाकरे यांनी फोन केला तरी त्यांच्या कोणत्याही कामाला मी कधीच नाही म्हटलं नाही. त्यांना मान ठेवला. मुख्यमंत्री असूनही मी स्वत: मातोश्रीवर जायचो. कुठेही मानापमान नाट्य केलं नाही. अनेकवेळा प्रोटोकॉलमध्ये पंतप्रधानांआधी मुख्यमंत्री बोलतो. मग इतर वक्ते बोलतात.
मी प्रोटोकॉल तोडून ठाकरेंना मानसन्मान दिला
मी प्रोटोकॉल तोडून माझ्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांना भाषण करायला द्यायचो. एवढं सर्व असताना. ठिक आहे. तुमचं नाही पटलं. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं. तुम्हाला दुसऱ्यासोबत जायचं होतं तर हिंमतीने सांगितलं पाहिजे होतं, असा हल्लाच त्यांनी उद्धव ठाकरेंवर चढवला.
