मनसे नेते अमित ठाकरे यांचा ताफा थांबवल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर तोडफोड केली होती. या प्रकरणी समृद्धी टोल प्रशासनाच्या वतीनं वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात 15 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर वावी पोलिसांनी 14 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, आता यातील आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
वावी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. रात्री आठ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अद्याप 5 ते 7 संशयित फरार असल्याची माहिती मिळाली आहे. टोलनाका तोडफोड प्रकरणी 12 ते 15 संशयित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांना टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला होता. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी आणि राज्य कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे.
टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्यांची उद्धट भाषा होती. फास्टटॅग असूनही गाडी बराचवेळ थांबवली. टोलनाक्याची टेक्निकल अडचण होती. मॅनेजरसह कर्मचाऱ्याची भाषा उद्धटपणाची होती” असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर मला नाशिकला पोहचल्यावर कळलं, की टोलनाका फोडला. राज ठाकरेंमुळे अनेक टोलनाके बंद झाले. माझ्यामुळे आणखी एक वाढला, असं अमित ठाकरे म्हणाले.
