गणेशोत्सवापूर्वी नागरिकांना चिपी विमानतळावरुन प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देणार – मंत्री रवींद्र चव्हाण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरुन सध्या सुरु असलेली विमान प्रवासाची सुविधा नियमित, सुरळीतपणे आणि अधिक फेऱ्यांच्या स्वरुपात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना उपलब्ध करुन देणार असून त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारकडे करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, पर्यटन जिल्हा म्हणून महत्वपूर्ण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगार वृद्धी तसेच स्थानिकांच्या प्रवासाच्या सोयीच्या दृष्टीने चिपी विमानतळावरील विमान प्रवास सेवा ही निश्चितच महत्वाची आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणारे चाकरमानी, पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने देखील ही सेवा अधिक उपलब्ध असणे आवश्यक आहे. विमान प्रवासाची सेवा सुरळीत होण्यासाठी अधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी बैठक घेण्यात आली आहे. याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची शासनाची भूमिका आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रोजगार संधी विस्तारण्यासोबतच स्थानिक प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने चिपी विमानतळावरुन पुरेशा प्रमाणात विमान प्रवास सेवा सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रोजगार संधी विस्तारण्यासोबतच, स्थानिक प्रवाश्यांच्या सोयीच्या दृष्टीने चिपी विमानतळावरुन पुरेशा प्रमाणात विमान प्रवास सेवा सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. याबाबत लवकर ठोस निर्णय घेण्याच्या दृष्टीने केंद्राकडे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात पाठपुरावा केला जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.