विधीमंडळ अधिवशनाच्या आज (4 ऑगस्ट) शेवटच्या दिवस असून आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यांसंबंधीची माहिती सभागृहात दिली. गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमाक देशात तिसरा नसून १० वा असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचार आणि त्यांच्या अपहरणांसंबंधी आकडेवारी देखील विधान परिषदेत सांगितली.
विधान परिषदेत राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा झाली. त्याला देवेंद्र फडणवीस उत्तर देत होते. सर्वोच्च न्यायालयाने महिला आणि बालके गायब होत असल्याने काही निर्बंध टाकले आहेत. महिला किंवा मुले गायब झाल्यास 72 तासांत तो एफआयआर करावा लागतो. त्यांना किडनॅप केले किंवा पळवून नेले या दृष्टीने तपास करावा लागतो. त्यातही महाराष्ट्र 12व्या क्रमांकावर आहे. बाल लैंगिक गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र 17 वा आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. आपण समज तयार करण्याचा प्रयत्न करतोय की राज्यात दररोज 70 मुली गायब होतायत, महाराष्ट्रात मुली सुरक्षित नाहीयेत, हे खरं नाहीये. आपण याचा विश्लेषण केलं, तेव्हा अनेकवेळा ज्येष्ठ महिला घरून निघून गेलेल्या असतात. काही घरची कारणं असतात, त्याची तक्रार होऊन पोलिस त्यांना घरी आणतात असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई महिलांना सर्वात जास्त सुरक्षित शहर वाटते असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महिला अत्याचार प्रकरणी यावर्षी 60 दिवसांत 85 टक्के चार्जशीट दाखल झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये उत्तर दिले. राज्यात बेपत्ता महिलांचा शोध घेण्याच्या टक्केवारीत सुधारणा झाली असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. 100 टक्के बालके शोधण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. ड्रग्ज, गुटखा प्रकरणात संयुक्त कारवाई सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
