नितीन देसाई मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी होईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी त्यांच्या एन.डी. स्टुडीओमध्ये आत्महत्या केली. यानंतर सर्व स्तरातून याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र या आत्महत्येमागचं नेमकं कारण समोर आले पाहिजे अशी मागणी देखील सर्व स्तरातून केली जात आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात देखील विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला. यानंतर नितीन देसाईंच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, नितीन देसाई मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी होईल. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार. आपल्या सर्वांचे दुर्देव आहे की ते लवकर आपल्यातून गेले. नितिन देसाई यांना काम सांगितले की ते उत्तम काम करायचे. चित्ररथ असो की शासकीय कार्यक्रम त्यांना काम सांगितले की ते उत्तम करायचे. असे अजित पवार म्हणाले.

नितीन देसाई यांचे विविध क्षेत्रातील लोकांशी जवळचे संबंध होते. आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत. पुढे बोलत असताना ते म्हणाले की, नितीन देसाई यांच्या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल. याबाबत काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले आहे. यात कोणीही राजकीय हस्तक्षप केला जाणार नाही. जो कोणी असेल तर त्याला कायद्यानुसार कडक शिक्षा होईल. देसाई यांच्या स्टुडिओवर कब्जा करण्याकरिता जोरजबरदस्ती करण्याचा तसेच त्यांना व्याजात फसविण्याचा प्रकार झाला का. त्यांच्यावर काही मानसिक दबाव घालण्यात आला होता का? आदी गोष्टींची सरकार नक्कीच चौकशी करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच पोलीसांना देसाईंच्या मृत्यूपूर्वीच्या काही ऑडीओ क्लिप देखील सापडल्या आहेत. यादरम्यान नितीन देसाई याच्यावरील तब्बल २४९ कोटींचं कर्ज असल्याची बाब समोर आली आहे. तसेच कर्ज घेतलेल्या या कंपनीकडून वसूलीसाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता का? याच्या चौकशीची मागणी केली जात आहे. दरम्यान या प्रकरणी आता एडेलवाइज एसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.