जयंत पाटील आणि अमित शाह यांच्यात कुठलीही भेट झाली नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह हे पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते. त्यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या गटाचे जयंत पाटील हे शाह यांना भेटले, अशी अफवा सकाळपासून सुरू होती. त्याविषयी फडणवीस हे पुण्यातील एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. तेव्हा त्यांना या शाह-पाटील यांच्या भेटीविषयी विचारले. तेव्हा त्यांनी काही लोकांना अफवा उठवायला फार आवडते, असा टोला लगावला. केवळ ते पतंगबाजी करत आहेत. माध्यमांनी देखील खात्री करूनच बातम्या द्याव्यात, अशी विनंतीही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला असं वाटतं की, काही लोकांना अफवा पसरवायला फार आवडतं. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी किमान खात्री करून बातम्या दिल्या पाहिजेत. जयंत पाटील आणि अमित शाह यांच्यात कुठलीही भेट झाली नाही. जे पतंगबाजी करतायत, त्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी आपला काहीतरी स्तर राखावा. तसेच अशा घटनेची पुष्टी केल्यानंतरच अशा प्रकारच्या बातम्या द्याव्या.”

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडली. अजितदादा राष्ट्रवादीत बंड करत भाजपबरोबर सत्तेत सामील झाले. यानंतर आता जयंत पाटील हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली. मात्र, यानंतर स्वत: जयंत पाटलांनी खुलासा करत हे वृत्त फेटाळले. तर फडणवीसांनीही या भेटीचे खंडन केले.