राज्यातील ३४ जिल्हा परिषदेमध्ये मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. १९ हजार ४६० जागांची ही भरती होणार आहे. त्यासाठी शनिवारी जाहिरात काढण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेसाठी एक हजार जागा सरळ सेवा भरतीने भरण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गात सरळसेवा भरती होणार आहे. त्यासाठी २५ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारीच यासंदर्भात माहिती दिली होती.
मार्च, २०१९ मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील १८ संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमी व इतर विविध कारणांमुळे परीक्षा होऊ शकली नाही. यानंतर शासनाच्या विविध विभागाद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ग्रामविकास विभागांतर्गत ही मेगाभरती करण्यात येत आहे.
राज्यातील जिल्हा परिषदेतील मेगाभरतीला सुरवात झाली आहे. १९ हजार ४६० जागांसाठी भरती प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची भरतीसाठी ५ ऑगस्टपासून अर्ज भरणे सुरू झाले असून १६ संवर्गांतील ४३२ जागा भरण्यात येत आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिली.पुणे जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी प्रक्रिया शनिवारपासून सुरुवात झाली. पुणे जिल्हा परिषदेत तब्बल १ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पुण्यातील ही भरती प्रक्रिया गेल्या चार वर्षांपासून चर्चेत आहे. २०१९ मध्ये जि.प.साठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. मात्र तिला स्थगित आली. त्यानंतर आता ही प्रक्रिया सुरु होत आहे.
जिल्हा परिषदेतील भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun२३/ या संकेतस्थळावरून अर्ज करावे लागणार आहे. अर्ज करण्यासाठी आधी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. ५ ते २५ ऑगस्टपर्यंत हा अर्ज करता येणार आहे. याच कालवधीत परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.ज्या उमेदवारांनी मार्च, २०१९ परीक्षेकरीता अर्ज केलेला नाही, त्यांनाही सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयास अनुसरुन कमाल वयोमर्यादेत २ वर्ष इतकी शिथिलता देण्यात आलेली असून ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता पात्र करण्यात आले आहे.
