अजित पवार यांनी आज पुण्यात साखर आयुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, अजितदादा गटास सामील व्हावे यासाठी शरद पवारांसोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांवर दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले, या चर्चा चुकीच्या आहेत. राष्ट्रवादीच्या कोणत्याही आमदारावर कशाचाही दबाव नाही. आमचा पक्ष, परिवार कसा व्यवस्थित ठेवायचा, याची काळजी आम्ही घेऊ. इतरांनी त्याबाबत काळजी करण्याची आवश्यकता नाही.
अजित पवार म्हणाले की, बैठकीत अमित शहांनी सांगितलं की, कारखान्यांना इथेनॉलचे प्लान्ट लावण्यासाठी मदत करायची आहे. तुमचे काही प्रस्ताव असतील तर ते पाठवून द्या. तसेच जे कारखाने अडचणीत आहेत, त्यांना एमसीडीसी मदत करण्यास तयार आहे. परंतु, कागदपत्रांची पूर्तता संचालक मंडळाने किंवा प्रशासकाने केली पाहिजे, असं अमित शहांनी सांगितल्याचं, अजित पवार म्हणाले.
कालच्या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी अजित पवारांचं कौतुक केलं होतं. त्यावर त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांना टोला लागावला. त्यानंतर लगेचच राऊतांवर अजित पवारांनी देखील पलटवार केला आहे. अजित पवार म्हणाले “अमित शाहांनी कौतुक केल्यानंतर तुम्हाला का वाईट वाटतंय?” असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी आज विचारला. “आम्ही वडिलधाऱ्यांचा आदर करणारी माणसे आहोत. राज्याच्या विकास करण्याकरता, परिसराचा कायापालट करण्याकरता, आपल्या अनेक समस्या सोडवण्याकरता, लोकप्रतिनिधीची कामं होण्याकरता मी हा निर्णय घेतला आहे. आज देशपातळीवर मला तरी नरेंद्र मोदींसारखा दुसरा पर्याय दिसत नाही”, काही जण माझ्यावर टीका करतात. माणसाच्या अनुभवातून वेगवेगळी मतं होऊ शकतात.असंही अजित पवार म्हणाले.
