किरीट सोमय्या पुन्हा मैदानात; ठाकरे गटावर केला १०० कोटींच्या कोविड घोटाळ्याचा आरोप

भाजपा नेते, किरीट सोमय्या पुन्हा एकदा राजकीय मैदानात परतल्याचं दिसुन येत आहेत. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे ते अडचणीत सापडले होते. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यानंतर काही दिवस त्यांनी कोणत्याही घडामोडींनी भाष्य केलं नव्हतं.

त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा आर्थिक घोटाळे समोर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलं आहे. ट्विट करत ते म्हणाले, “रु. 100 कोटींचा मुलुंड कोविड हॉस्पिटल घोटाळा.1850 खाटांचे तात्पुरते कोविड हॉस्पिटल बांधण्याचा खर्च रु 10.94 कोटी. मुंबई महानगरपालिकेने दर महिने रु. 3,59,78,389 प्रमाणे 25 महिने भाडे दिले. ठाकरे सरकारचे मित्र ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी कंपनीला 100 कोटी रुपये गिफ्ट. चौकशीची होणार.

उद्धव ठाकरे व महाराष्ट्र सरकारने रिचार्डसन क्रूडास या भारत सरकारच्या कंपनीकडून मुलुंड येथील जागा ताब्यात घेतली. सिडकोला तात्पुरते हॉस्पिटल बांधून देण्याचे आदेश दिले. सिडकोने ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनीला 1850 खाटांचे हॉस्पिटल बांधण्याचे आदेश दिले. ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनी एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती. 7 जुलै 2020 ते 31 जुलै 2022 असे 25 महिने हॉस्पिटल चालू ठेवण्यात आले. त्यासाठी भाड्यापोटी ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनीला 90 कोटी रुपये देण्यात आले. बांधकामासाठी 10 कोटी रुपये दिले असे मिळून 100 कोटींचा घोटाळा उद्धव ठाकरे यांनी केला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

रिचार्ड्सन कृडास कंपनी कडून भाड्याने घेण्यात आलेल्या जमिनीचा एकही पैसा देण्यात आला नाही असा सुद्धा आरोप आहे. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस, आयकर विभाग, ईडी कार्यालय यांना तक्रार दिली असल्याचे सांगितले. या कोविड सेंटर प्रमाणे मुंबई मधील 15 कोविड सेंटरसाठी 700 कोटी रुपये भाडे घोटाळे करण्यात आले आहेत असा किरीट सोमय्या यांचा आरोप आहे.