सामनाच्या अग्रलेखावर आशिष शेलारांचे ट्विट करत प्रतिउत्तर; प्रभादेवीच्या गल्लीतील “पत्रकार पोपटलाल” आता ऐकाच

सामना मधील आजच्या अग्रलेखातून भाजप आणि अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनातून म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र हे छत्रपती शिवरायांचे राज्य आहे. डॉ. आंबेडकर याच मातीतले, त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले तरी येथे कायद्याचेच राज्य शेवटपर्यंत राहील. पोर्तुगीज, ईस्ट इंडियाचे व्यापारी आले-गेले तसे सध्याचे धनिक व शेठ मंडळांचे सावटही दूर होईल. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की, केंद्रीय मंत्री अमित शहा यांना महाराष्ट्र चांगला कळतो. बहुधा म्हणूनच ते मुंबई व महाराष्ट्रात निवडणुका घ्यायला धजावत नाहीत. व्यापारी बहुमत विकत घेतात, पण जनतेस सामोरे जात नाहीत.

याच पार्श्वभूमीवर भाजपाचे आशिष शेलार यांनी प्रतिउत्तर देत ट्विट केलं आहे. शेलार म्हणाले की,

मा. अमितभाई शाह यांना महाराष्ट्र कळतो म्हणजे काय ?

प्रभादेवीच्या गल्लीतील “पत्रकार पोपटलाल” आता ऐकाच!

■२०१६-१७ च्या पूर्वीच्या काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेल्या रक्कमेला खर्च म्हणून मान्यता दिली. त्यामुळे सुमारे १०,००० कोटी रुपयांचा दिलासा देशातील साखर कारखान्यांना मिळाला.

■एफआरपीपेक्षा जास्त भाव दिला म्हणून त्या फरकावरील रकमेवर लागू केलेला साडे नऊ हजार कोटी रुपयांचा प्राप्तिकर केंद्र सरकारनं रद्द केला.

■एस डी एफ म्हणजे साखर विकास निधी अंतर्गत घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन होणार

■कारखाना कोलमडला तर शेतकरी कोलमडेल, शेतकरी कोलमडला तर ग्रामीण महाराष्ट्र कोलमडेल… असा महाराष्ट्र मा. अमितभाई शाह यांना कळतो.

■केंद्रीय राखीव पोलीस दलात भरतीची परीक्षा मराठीत घेण्याचा निर्णय अमितभाई शाह यांनी घेतला, असा महाराष्ट्र त्यांना कळतो.
●●अहो, पत्रकार पोपटलाल!
■छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

या महाराष्ट्राच्या महान सुपुत्रांचा इतिहास, बलिदान, योगदान हे मा. अमितभाई शाह यांना कळते ते महान सुपुत्रांच्या चरणी नतमस्तक होतात, असा महाराष्ट्र त्यांना कळतो.
■ भारतरत्न लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी यांचे योगदान नक्षत्रांचे देणे आहे, हे अमितभाईंना कळते आणि असा महाराष्ट्र त्यांना कळतो!

■ आणि हो पोपटलाल बीसीसीआयचे ऑफिस अजूनही मुंबईतच आहे तर मुंबईचा रोहित शर्मा कॅप्टन झाला, अजिंक्य रहाणे व्हाईस कॅप्टन झाला मुंबईचा अजित आगरकर निवड समितीचा अध्यक्ष झाला, असा कळतो त्यांना महाराष्ट्र..

ही काही वानगीदाखल उदाहरणे.

■ मुंबईसाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्यांच्यावर गोळ्या झाडणार्‍या, हुतात्म्यांचे हात रक्ताने माखलेल्या काँग्रेससोबत तुम्ही सत्तेत बसलात, तुम्हाला मुंबईवर बोलण्याचा अधिकार काय?

तरीही, कुठे भेटायचे ते ठरवा

सविस्तर समजून घ्यायचे तर आम्ही तयार..
प्रभादेवीच्या गल्लीतील पत्रकार पोपटलाल!!