फुले साहित्याचे अभ्यासक,ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्याविषयी समग्र लिखाण करणारे, ज्येष्ठ विचारवंत, संशोधक आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे आज मुंबईत निधन झाले. एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हरी नरके यांना हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. थोड्याच वेळात छगन भुजबळ रुग्णालयात दाखल होणार आहेत.

मुंबईतील एशिअन हार्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मागील वर्षभरापासून हरी नरके आजारी होते. त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात 15-20 दिवस दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एक-दोन महिन्यापूर्वी राजकोट येथील रुग्णालयात गेले होते. तिथे त्यांची प्रकृती स्थिर झाली होती. आज ते मुंबईला येत असताना प्रवासात सहा वाजताच गाडीत त्यांना दोन उलट्या झाल्या. त्यानंतर समिर भुजबळ यांनी ड्रायव्हरला एशियन हार्ट घेऊन जाण्यास सांगितलं, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला, त्याचे संपादक हरी नरके होते. डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने 26 खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन हरी नरके यांनी केले होते.

डाव्या चळवळीशी नरके यांचा नजिकचा संबंध राहिला. फुले साहित्याचा अभ्यासक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी 56 पुस्तकांचं लेखन आणि संपादन केलं आहे.मराठीतील एक प्रसिद्ध लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि त्याचबरोबर मराठी ब्लॉगर अशी हरी नरके यांची ओळख राहिली. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक राहिले. ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते.