पोटात दुखतंय म्हणून काहीजण रोज पत्र लिहितात;असच पत्र त्यांनी स्वत:ला 25 वर्ष लिहायला हवं होतं – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. मुंबई महापालिकेच्या कामाचे कौतुक करताना मुंबईतील खड्ड्यांवर त्यांनी भाष्य केले. ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे सातत्याने मुंबईच्या विकासकामांशी संबंधित मुद्दे उपस्थित करत आहेत. राज्य सरकार विकास कामात कसं कमी पडतय, ते दाखवून देण्याचा आदित्य ठाकरे यांचा प्रयत्न आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल नाके बंद करण्याची मागणी केली होती. त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. तोच धागा पकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला.

मुंबईत सुशोभीकरणाचे कामे सुरु आहेत. चांगले काम केलं जात आहे. तरी काहींच्या पोटात दुखतंय. ते दररोज एक पत्र लिहितात. त्यांनी गेल्या २५ वर्षात ही पत्र स्वत:ला लिहिली असती तर मुंबईची ही अवस्था झाली नसती, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. फडणवीस आझाद क्रांती मैदानातून बोलत होते.

ऑगस्ट क्रांती मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा गांधी यांच्या स्मृती स्तंभाला अभिवादन केले. याच ऑगस्ट क्रांती मैदानावरून ७ आणि ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधीजींनी इंग्रजांना ‘चले जाव’चा इशारा दिला होता. त्यानंतर इंग्रजांविरोधात देशभरामध्ये वातावरण पेटलं होते या दिवसाची आठवण म्हणून ऑगस्ट क्रांती मैदानावर सरकारच्याकडून याकार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते.

“सध्या चांगली कामं सुरु आहेत. त्यामुळे काहीच्या पोटात दुखत आहे. पोटात दुखत असल्याने काही लोक रोज पत्र लिहित आहेत” असं सांगून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मुंबईतील विकास कामांवरुन आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर काही दिवसांपूर्वी जोरदार टीका केली होती. त्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

फडणवीस यांनी यावेळी पालिका आयुक्त चहल यांचे कौतुक केले. चहल चांगले काम करत आहेत. टीका होत राहतील, पण तुम्ही पारदर्शक काम करत रहा. निंदकाचे घर असावे शेजारी, असं म्हणतात ते खरंच आहे. तुम्ही आपलं काम करत रहा. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील, असा विश्वास फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.