सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा या संस्थेचे ‘छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा’ असे नामाधिकरण करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली .
सातारा येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ५०० रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. संस्थेचे नामाधिकरणाचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला असून त्यानुषगांने आवश्यक ती कार्यवाही आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई करीत असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
त्या अनुषंगाने आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई यांनी तात्काळ याप्रमाणे कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहेत. हा शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. हा अध्यादेश साताऱ्याच्या जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, विभागीय आयुक्त पुणे, औषधी द्रव्य विभागाचे सहसचिव रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता यांना कळविण्यात आला आहे.कृष्णा नगर येथे सातारा मेडिकल कॉलेजची इमारतीचे काम सध्या जोरात सुरू आहे पहिल्या टप्प्यांमध्ये 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाचे छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय असे नामकरण करावे ही मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती.
