राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी कामांचा आढावा घेऊ शकतो; अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू झाला आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रातील समितीचा आढावा घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये कोल्ड वॉर सुरू झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. काल दिवसभर याबाबतची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. त्यावर अजित पवार यांनीच खुलासा केला आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप केला नाही. अर्थमंत्री म्हणून मी विकास कामांचा, प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो. तुम्हाला काय त्रास आहे? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार आणि चंद्रकांत पाटील या दोन्ही नेत्यांपैकी कुणालाही नाराज करू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्याचं अजित पवार यांनी खंडन केलं आहे. मी अनेक वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. आपल्याकडे अनेक वर्षापासून 15 ऑगस्टचं झेंडा वंदन राज्यपालच करतात. इथे कधीही 15 ऑगस्टचं झेंडा वंदन पालकमंत्री करत नाहीत’, असं अजित पवार म्हणाले आहेत.

मी या राज्याचा अर्थमंत्री म्हणून कामांचा आढावा घेऊ शकतो. फायनल निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच असतो. मोपलवारही बैठकीला होते. पण काहींनी वेगळ्याच बातम्या चालवल्या. हे असं झालं, ते तसं झालं, अरे तुम्हाला काय त्रास होतो? जर राज्याचे प्रश्न, मेट्रोचे प्रश्न मार्गी लागत असतील तर काय अडचण आहे? यंत्रणा हलवली की कामं मार्गी लागतात असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. मी आज आढावा घेतला तरीही अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाच असणार आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा. लोकांची कामं झाली पाहिजेत म्हणून आम्ही लक्ष देत आहोत. तुम्ही काम रखडलं तर सांगा, आम्ही लक्ष देऊ, राज्याचा विकास होणं आवश्यक आहे असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

कुणाला कुठे ध्वजारोहण करण्याची जबाबदारी द्यावी हा राज्याच्या प्रमुखांचा अधिकार आहे. वेगवेळ्या मंत्र्यांना झेंडा वंदनाची जबाबदारी देण्यात आली आहे. माहिती घ्यायची नाही, रुसवे, फुगवे सांगतात. कुणाचा रुसवा आणि कुणाचा फुगवा? कुणी तुम्हाला रुसून सांगितलं. कुणी फुगून सांगितलं. चुकीच्या बातम्या देऊ नका, असं आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केलं आहे.