पुण्यात आता मेट्रो सेवा सुरु झाली आहे. पीएमपीची बस सेवा आधी पासूनच सुरु आहे. लोकल ट्रेन्सही पुणे ते लोणावळा मार्गावर धावतात. पुण्याशी जोडणाऱ्या या सर्व ट्रान्सपोर्ट सिस्टिम्सना वन कार्ड योजनेनं जोडण्यासाठी काम करावं, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महा मेट्रोचे एमडी श्रावण हार्डिकर यांना केल्या आहेत. त्यामुळं पुणेकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.पुणे विमानतळाचे काम दहा वर्षांआधी झाले असते तर पुण्याचा विकास दर अधिक असता, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पुणे हे बुद्धिवंतांचे शहर म्हणून ओळखले जाते. यामुळे पुण्यात निर्णय घेताना दमछाक होते. मेट्रोसंदर्भात असेच झाले. पुणेकर एका प्रस्ताववर समाधानी होत नाही. एक प्रस्ताव आणला तर दुसऱ्या देशातील आणखी प्रस्ताव येतो. मग आणखी नवी प्रस्ताव येतो. यामुळे पुणे मेट्रोचा प्रस्ताव रखडला गेला. परंतु पुण्याच्या नंतर नागपूर मेट्रोसंदर्भात प्रस्ताव आला. त्यानंतर नागपूर मेट्रो पूर्ण झाली. परंतु पुणे मेट्रो रखडली गेली.
पुणे मेट्रोत आता केवळ वाढदिवस साजरे होत नाहीत तर लोक प्रवासही करायला लागले आहेत. पण आता वनकार्ड सुरु झाल्यामुळं त्याचा देखील प्रवाशांना फायदा होईल. हार्डिकरांना माझी सूचना आहे. तसेच पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमपीएम यांनाही माझी सूचना आहे की हे जे वनकार्ड आपण काढलं आहे ते पीएमपीच्या बसला देखील लागू होईल, अशा प्रकारचं हे वनकार्ड झालं पाहिजे. म्हणजे आता या वनकार्डवर आपली मेट्रो आणि बस सिस्टिम एकत्रित चालली पाहिजे.
पुण्याच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गडकरी साहेब आणि राज्य सरकार करेल असे फडणवीस यावेळी म्हणाले. नितीन गडकरी यांच्यासारखे दृष्टे नेते आपल्याकडे आहेत. गेल्या नऊ वर्षामध्ये गुणात्मक परिवर्तन झालं आहे. पायाभूत सुविधा वाढत असल्याचे फडणवीस म्हणाले. अलिकडे मी एक सर्वे वाचला. यामध्ये दहा किलोमीटर जाण्यासाठी 30 मिनीटांचा वेळ लागतो. त्यामुळं जो देशातील पहिल्या सहा ट्रॅफिक जाम असलेल्या शहरात पुण्याचा नंबर लागतो. त्यामुळं पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करणं गरजेचं असल्याचे फडणवीस म्हणाले. वाहतूक कोंडी संपवण्यासाठी उड्डाणपूल करणे गरजेचे आहे. आता आपण ज्या वेगानं काम करतोय, त्यामुळं वाहतूक कोंडी फोडणे शक्य होणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
पुणे शहरात विमानतळही 10 वर्षे आधी झाला असता तर पुण्याच्या जिडीपी मध्ये 2 टक्क्यांनी भर पडली असती. पुणे शहरातील वाहतूक कोंडी हा गंभीर विषय आहे. यामुळे या ठिकाणी रिंग रोड आणि सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा निर्माण करण्याची गरज होती. आता पुण्यातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी डबल डेकर पूल तयार करण्याचा प्लॅन नितीन गडकरी यांनी तयार केला आहे. यामुळे पुणे शहर वाहतूककोंडी मुक्त शहर करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
