स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशाला करणार संबोधित

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 7 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज (14 ऑगस्ट रोजी) राष्ट्राला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती भवनाने रविवारी (13 ऑगस्ट) एका निवेदनात सांगितले की, हे संबोधन संध्याकाळी 7 वाजल्यापासून ऑल इंडिया रेडिओच्या संपूर्ण राष्ट्रीय नेटवर्कवर आणि सर्व दूरदर्शन वाहिन्यांवर हिंदी आणि नंतर इंग्रजीमध्ये प्रसारित केले जाणार आहे. “दूरदर्शनवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये संबोधनाचे प्रसारण दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांद्वारे प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित केले जाईल. ऑल इंडिया रेडिओ रात्री 9.30 वाजता आपल्या संबंधित प्रादेशिक नेटवर्कवर संबोधनाची प्रादेशिक भाषेतील आवृत्ती प्रसारित करेल,
असे निवेदनात म्हटले आहे.

त्याचबरोबर उद्या 15 ऑगस्टला देशाच्या 77 वा स्वातंत्र्य दिनी देशाचे पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. उद्या एतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर देशाचे पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार आहेत.यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यामध्ये 1800 विशेष पाहुणे सहभागी होणार आहेत. यामध्ये 400 हून अधिक गावांचे सरपंचाचा समावेश आहे. यासाठी 12 वेगवेगळ्या ठिकाणी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

केंद्र सरकारच्या विविध योजना व उपक्रम अधोरेखित करणारे ‘सेल्फी पॉइंटस’ १२ महत्वाच्या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. राष्ट्रीय युद्ध स्मारक, इंडिया गेट, विजय चौक, नवी दिल्ली रेल्वे स्थानक, प्रगती मैदान, राज घाट, जामा मशीद मेट्रो स्थानक, राजीव चौक मेट्रो स्थानक, दिल्ली गेट मेट्रो स्थानक, आयटीओ मेट्रो गेट, नौबत खाना आणि शीश गंज गुरुद्वारा यांचा यात समावेश आहे.‘सेल्फी पॉइंटस’मध्ये लस आणि योग; उज्वला योजना; अंतराळ सामर्थ्य; डिजिटल इंडिया; स्कील इंडिया; स्टार्ट अप इंडिया; स्वच्छ भारत; सशक्त भारत, नव भारत; प्रधानमंत्री आवास योजना आणि जल जीवन अभियान या योजनांचा समावेश आहे.