रोहित पवारही उद्धव गटाचे प्रवक्ते झाले म्हणजे आश्चर्य आहे; रोहितजी आपला पक्ष बरा – संजय शिरसाट

राज्यात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही शिवसेनेच्या आमदारांवर टीका केली आहे. या टीकेला शिवसेनेचे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी चोख प्रत्युत्तरही दिलं आहे.

जे सत्तेसाठी सरकारमध्ये गेले आहेत ते नाराज राहणार नाहीत असे होणार नाही, ते नाराज राहणारच. कारण त्यांना व्यक्तिगत कितीही दिले तरी कमीच आहेत. १५ आमदार जे शिवसेनेत (शिंदे गट) गेले आहेत ते येत्या काळात उद्धव ठाकरेंकडे जाण्याचा प्रयत्न करतील. चर्चा सुरू आहे. फक्त त्यांना पुन्हा पक्षात घ्यायचे की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार का? हे बघावे लागणार, असे रोहित पवार म्हणाले होते.

रोहित पवारांच्या या दाव्यावर आमदार संजय शिरसाट यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवारही उद्धव गटाचे प्रवक्ते झाले का? ते प्रवक्ते म्हणजे आश्चर्य आहे. राऊत होते प्रवक्ते, आता हे कशाला होतायत? असा सवाल करताना रोहितजी आपला पक्ष बरा, आपल्याला काय करायचं दुसऱ्या पक्षात काय चाललंय ते”, अशी टीका त्यांनी केलीय.

“सत्तेत सहभागी असलेले शिंदे गटातील काही आमदार नाराज आहेत. शिंदे गटातील १० आणि इतर ५ असे मिळून १५ जण ठाकरेंकडे जाण्यास इच्छुक आहेत. शिंदे गटामध्ये याबाबत कुजबूज सुरू आहे. येत्या काळात यासंदर्भातील काही घटना घडणार आहेत. तसंच, येत्या काळात शरद पवारांच्या विचारांचाच विजय होईल”, असंही रोहित पवार म्हणाले.