काही लोक निवडणूक आली की, मराठी माणूस मुंबईबाहेर गेल्याची आरोळी ठोकतात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस विश्रांती घेण्यासाठी आपल्या शेतात गेले होते. यावरून विरोधकांकडून अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परतले असून त्यांनी उद्धव ठाकरे गटावर खोचक टीका केली. ते म्हाडाच्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी शिंदे म्हणाले की, घर हे सर्व सामान्यांचं स्वप्न असतं, सामान्य माणूसाला बळ देण्याचं काम म्हाडा करतेय. म्हाडावर लोकांचा विश्वास वाढलाय आहे. मंत्री सावेंप्रमाणे मलाही काही जणांनी घरासाठी विचारलं होतं. पण मी म्हटलं आता तसे काही चालत नाही. आता सर्व पारदर्शकता आहे. म्हाडाच्या या लॉटरीमुळे मुंबईबाहेर गेलेले मुंबईकर पून्हा मुंबईत आणण्याचा आमचा प्रसत्न असल्याचं शिंदे म्हणाले.

म्हाडा’च्या मुंबई मंडळाच्या ४ हजार ८२ घरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज, सोडत काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना एक आशेचा किरण दाखवला आहे. मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे हा कार्यक्रम पार पडला. “गेल्या अनेक वर्षांचे प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न जादूच्या छडीसारखे सोडवता येणार नाहीत. पण जी कामं थांबली होती ती आता सुरू करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस २०१४-१९ काळात मुख्यमंत्री होते. त्या काळात मीही कॅबिनेटमध्ये होते. तेव्हाही अनेक निर्णय आम्ही घेतले होते. परंतु, मागच्या अडीच वर्षांच्या काळात अनेक कामे थांबली”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे पुढं म्हणाले की, काही लोकं निवडणूक आली की मराठी माणून मु़ंबई बाहेर गेल्याची आरोळी ठोकतो, राजकारण करतो. आम्ही ते करणार नाही. आमचा प्रयत्न प्रामाणिक, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी उद्ध ठाकरे गटाला लागवला आहे. तसेच आम्ही टिकेला कामातून उत्तर देतो. राजकिय इच्छा शक्ती असली की चांगली कामे करता येतात, असंही एकनाथ शिदेंनी म्हटलं.