राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या जामीनाची प्रक्रिया आज पूर्ण होणार आहे. नवाब मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव वैद्यकीय जामीन मिळावा अशी याचिका नवाब मलिक यांनी केली होती. मलिकांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात मान्य केली आहे. या जामिनाची प्रक्रिया आज मुंबई सत्र न्यायालयात पूर्ण केली जाणार आहे. विशेष कोर्टानं रिलीज ऑर्डर दिल्यानंतर मलिकांच्या सुटकेचे आदेश जारी होणार आहेत.
नवाब मलिकांना जामीन देताना कोर्टाने काही अटी घालून दिल्या आहेत. मालिक यांना ५० हजारांच्या वैयक्तिक बॅान्डवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.किडनीच्या आजाराने त्रस्त असलेले नवाब मलिक हे गेल्या वर्षभरापासून कुर्ल्यातील क्रिटी केअर रूग्णालयात उपचार घेत आहेत. गोवावाला कंपाऊंडमधील मनी लाँडरिंगप्रकरणी नवाब मलिकांना ईडीने 23 फेब्रुवारी 2022 ला अटक केली होती.नवाब मलिकांना 11 ऑगस्टला जामीन मंजूर झाला आहे. जामीन मंजूर केल्यानंतर राऊत तुरुंगाबाहेर कधी येणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान मलिक यांना काही अटी घालुन देण्यात आल्या आहेत. यामध्ये मलिक यांच्या प्रकरणातील साक्षीदार व अधिकारी यांच्याशी संपर्क ठेवायचा नाही. त्याचबरोबर मलिक यांच्याशी संपर्क होईल तो नंबर ईडीच्या अधिकाऱ्यांना दिला जावा. तसेच मलिकांचा पासपोर्ट ईडीकडे जमा करण्याची अट देखील घातली आहे. त्याचबरोबर कुठल्याही माध्यमाशी संवाद साधायचा नाही, गुन्हेगारी कृत्यात भाग घेऊ नये. अशा अटी ही घालण्यात आल्या आहेत.
शिवसेनेतील फुटीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली. अजित पवारांनी काका शरद पवारांची साथ सोडत भाजप आणि शिंदे गट यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले. एक शरद पवार गट आणि दुसरा अजित पवार गट. अशातच आता नवाब मलिकांना जामीन मिळाल्यानंतर ते कोणाची साथ देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
