कोण कुणाला कोंडीत पकडतंय हे काळच ठरवेल – धनंजय मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त भेट घेतली आहे. वडिलकीच्या नात्याने पुतण्याची भेट घेतली, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं. मात्र, या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शरद पवारही सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

अशी एकंदरीत राजकीय स्थिती असताना येत्या १७ ऑगस्ट रोजी शरद पवार बीडमध्ये जाहीरसभा घेणार आहेत. या सभेतून शरद पवार आपली भूमिका अधिक स्पष्टपणे मांडतील, असं बोललं जात आहे. त्यामुळे बीडमध्ये शरद पवार काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शरद पवारांची ही सभा अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडण्यासाठी असू शकते, असंही बोललं जात आहे.

या सभेआधी मंत्री मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सभेबाबत त्यांना विचारले असता मुंडे म्हणाल, एक गोष्ट लक्षात घ्या, कोण कुणाला कोंडीत पकडतंय हे येणारा काळच ठरवेल. असे सूचक उत्तर मुंडे यांनी दिले.पक्ष बांधणीसाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यांच्याकडून ठिकठिकाणी सभा घेतल्या जात आहेत. आता अशीच सभा उद्या बीडमध्ये होत आहे. या सभेतून पवार काय फटकेबाजी करणार, कुणाला निशाण्यावर घेणार याची उत्सुकता आहे. सभा अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या होम ग्राउंडमध्ये होत आहे म्हटल्यानंतर या सभेच्या माध्यमातून धनंजय मुंडेंचीही कोंडी करण्याचा शरद पवार गटाचा उद्देश लपून राहत नाही. त्यामुळे शरद पवार या सभेतून धनंजय मुंडे यांच्यावर काय टीका करतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.